Thursday, June 25, 2015

गजल

Gayatri S Muley

खेळात आज माझ्या मी बाद का कळेना
जिंकून हारण्याचा मज नाद का कळेना

आतून अर्थ परके ओळीत भाव नाही
देऊ खुल्या मनाने मज दाद का कळेना

संपून काल गेले जे आपलेच होते
चालू अजून कैसा हा वाद का कळेना

काहीच सांगण्याला शब्दात जे उरेना
मौनात घातलेली मज साद का कळेना

कित्येक आजवर त्या थापाच ऐकल्या मी
निवडुंग सांगणारी फिर्याद का कळेना

आवाज तोच होता कोणास मी दिलेला
संपून आज गेला संवाद का कळेना

ओघात बोलण्याच्या नाहीच मी तुझ्या रे
आले उगाच तुजला मी याद का कळेना

मौनात काल केली भाषांतरे कश्याला
आला पुढे मनाचा अनुवाद का कळेना


...गायत्री..मुळे

October 31

No comments:

Post a Comment