संवाद

रस्ता कायम असतो .काही खणाखुणा मात्र जब्बर रुतून बसलेल्या असतात.
ठरावीक अंतरा नंतर येणारी खूण काळजात काहीतरी उलथापालथ करून जाणार आहे माहीती असत..
.खर तर त्या वेळे पासून नजर दुसरीकडे वळवीली तर ती खूण टाळता येऊ शकते................पण नाही...
मुद्दाम तिकडे पाहील्या जातेच...अगदी हटकून..मग भिरभिरणारी नजर कुठेतरी तिथेच रेंगाळते...खूण मागे पडली असते..
मी मुद्दाम ठरवून आजकाल विरुध्द दिशेला बसते...जणू काही मधे येणा-या त्या दोन सीट मधले अंतर त्या जागे पर्यंत मला जायला अडवणार असत..
मग मान उंचावून बाजूच्या सिट वर बसलेल्याला लक्षात येईल इतपत तोंड वर काढून बघीतल्या जातेच तिकडे....दिसेल न दिसेल शी ती जागा डोळ्यापुढे येते ... दिसेनाशी सुध्दा होते.
एक भुंगा सु......ई करत मनात शिरतो...
काय काय कुरतडायला लागतो.
खरतर हे अस होणार हे मला प्रवासाला सुरूवात करतानाच माहीती असते ...मग मी डोळे बंद करून घेते...आणि नकळत त्या भुंग्याच्या मागे जाऊन पोचते .त्याला सांगते...थांब तू नको कुरतडू...मीच सामोरी जाते आहे.मग त्या जागेला तेंव्हा असलेला सुगंध सुध्दा मनात दरवळायला लागतो.......ते त्या दिवशीचे रण रण उन जाणवायला लागते .खरतर आज वातावरणात एक अल्हाद दायक शांतता होती..पण ती आठवलेली रण रण दुपार मनाला नकळत शांत करायला लागते.मग सगळी गोळाबेरीज....त्या दिवशी झालेल्या काही तुकड्यातले तुकडे सापडतात का हा शोध सुरू होतो.खूप ठिकाणी , काहीतरी , कुठेतरी अर्धवट वेचून आणले होते मी त्यादिवशी स्वत:ला
.मी आता त्या क्षणाशी येते जिथून फक्त अपमानाचे पडसाद मनात उमटायला लागतात.प्रत्येक वेळेस मी काही ना काही स्वत:चा तुकडा तिथून उचलून घेते.तो सांधायचा असतो.मला माझ्या आजच्या अस्तीत्वाशी.तो चपखल बसतो खरा..सांधल्या जातेय का नाही कळत नाही .पण त्या तुकड्याचा रंग मात्र विटला असतो....
किती जुळवून घ्यायचा , किती पटवून घेऊन मनाला फसवायचे हे आता कळेनासे व्ह्यायला लागले
पुढच्या वेळेस ह्या रस्त्याने जाताना मी वळून बघणार नाही...हा निश्चय परत एकदा करते....
मग ओघळू देते .स्वत:
..तो भुंगा सुध्दा ओघळतो मग.........
.
...................गायत्री...........
July 3 at 11:40am


**********************
Gayatri S Muley
एखादी शर्यत किंव्हा एखाद्या स्पर्धेत भाग घ्यावा...जीव तोडुन खेळावे...एकतर जिंकावे नाहीतर हारावे...जिंकले तर हसत नाचत आनंदोत्सव साजरा करावा...हरले तर काहीही विचार न करता ढसढस रडावे
.
एक तर हे टोक नाहीतर ते टोक.....
अधे मधे काही नकोस झालय आता.
जीत तरी सपशेल
नाहीतर
हार तरी सपशेल
.
January 7.  2015
............................................
संवाद.
संवाद....

मी तावून सुलाखून अजुनच झळाळून परत आले आहे....मी पवित्र आहे का मला माहीत नाही..पण शुध्द नक्कीच आहे
आता पावित्र्य काय निकषावर ठरवणारेस तू?
मनाच्या की शरीराच्या.
अस नव्हत की संलग्नता नव्हती.कुठे तरी काही तरी कमतरता होती असे ही नाही
पण मला सगळ्या चाळण्या लाऊन घ्यायच्या होत्या.मनाला.मेंदूला...बघ न....filtered...जास्त शुध्द असत.न? पाणी सुध्दा गाळून....मग मी माझ्यातल्या काही कमतरता गाळून जर परत फिरलीय....तर मला ह्या किना-यावर वाट पहाणारे कोणीच का सापडू नये?
मी स्थानभ्रष्ट झाले....
मी बेभान व्हायला ...मी भरारी घ्यायला निघाले
मला आसमंत हवा होता...पण घरट्यात अडकलेले माझे मन कायम तिथे बांधलेले होते.
तुला माझ हरवलेले रहाण जाणवायच....काही क्षण मी स्वत:पासून तुटायची.
मग.मनभर एक अस्वस्थता...कुतर ओढ....मनाचे तुकडे


पारडे नेहमी आपलेच जड असायचे
पण तरीही ही घुसमट सहन होईना
म्हणुन पसरले पंख....घेतली भरारी...पण खर सांगू
अधे मधे काही क्षण फक्त हरवणारी मी
सगळ्या भावना...चेतना...उर्जा घरट्यात विसरून आली होती
एकेका परिक्षेत उतरत होते.
तावून सुलाखून निघत होते
शुध्द होत होते
जणू परीस स्पर्ष माझ्या मनाला मिळत होता.
मग मी लखलखुन....तेजाळून....बावनकशी सोन्यासारखी शुध्द अंत:करणाने परतलीय...
पण खर सांगू.....आधी फक्त काही जागा रिक्त होत्या....त्यांच्या शोधात मी निघाले.

पण ते शोधताना जाणवले....ह्या घरट्या शिवाय मी अस्तीत्व शून्य आहे.
जी परीपुर्णता मला हवी होती ती इथेच आहे
ह्या काडी काडी करून जोडलेल्या घरात मला जागा नसली तरी ..
अस्तीत्वाचा शोध पुर्ण झालाय

.
गायत्री.....
January 21, 2015
,....................................................


मैत्र...

मग आम्ही आयुष्यभर एकमेकांचे फक्त मित्र राहीलोत.त्या नात्यात प्रेम .ओढ .नसते असे नाही.पण तू त्या शब्दाची व्याख्या शोधतोय आणि मला त्याची व्याप्ती माहीती आहे.

म्हणूनच मला त्याला डीफाईन नाही करता येणार.
आणि तुला त्याचा माझ्या मनात असलेला ....खोल असलेला अर्थ नाही समजू शकणार
मी नाही सांगू शकत.

पण मी तुला काही आरोपीच्या पिंजर्यात ठेवत नाहीय.कारण मला माहीताय ओबढ धोबड असल तरी तुला प्रत्येक नात हे चौकटीत बसायला हवे असते.आणि मैत्रीला बसू शकणारी चौकट अजून तयार व्हायचीय
ती अथांग असते.ती थेंबाइतकी असली तरी ती सगळ ब्रह्मांड व्यापून उरते ..तिला एकच तराजू तोलू शकतो ...विश्वासाचा.
मला गरज नाहीय ह्याला चौकट घालायची ना तोलायची ना मोजायची.उलट नाते तर आज आपले ठेवल्या गेले वजन काट्यावर....समाधान होईल इतपत वजन आहे न आपल्या नात्याला........पटले का ?

परतून तर खुपदा पाहीले त्या नात्याकडे त्या मैत्रीकडे
पण कुठलाच गंध त्याला कधीच नव्हता ..म्हणून मला जाणवला नाही...
तुला जाणवला कारण मैत्रीत जो विश्वास असतो न एकमेकांवर तो इतर कुठल्याच नात्यात असू शकत नाही .
.
का नसावे इतर नाते इतके सहज.?काही रक्ताचे काही जोडलेले तर काही कर्माने नशीबी आलेले नाते असतात.मैत्री हे नाते फक्त आपण आपल्या इच्छेने जोडलेले असते...तिथे आपला चॉईस असतो..सगळ्या वेव्हलेंथ जुळाव्याच असे जरूरी नसते ..किंव्हा समांतर रेषांची सुध्दा गरज नसते.बस एक विश्वास असतो....तू एकटेपणा अनुभवणार नाहीस...सतत माझ्या मैत्रीचा हात सोबत असेल...सुखाशी देण घेण नसत पण दु:खात न सुटणारी साथ असते .बस इतकेच

बघ नाही म्हणता म्हणता मी व्याख्या करायचा प्रयत्न केला.पण फार तोकडी पडतेय
कितीक काळापासून मी मैत्री शोधतेय तुझ्यात ...मिळेल मला अशी मैत्री?
चौकट नसलेली?
.
गायत्री ....
March 16, 2015
.....................................................................
किना-र्यावर मुळे रुजलीयेत माझी .कसा सोडू किनारा आणि निघू वहात? तरंगणार्या ओंडक्याला काहीच अस्तीत्व नसते.म्हणून ते प्रवाहासोबत वहात जात...मी सगळा ठाव कसा सोडू शकणार? मुळांची साथ सुटली तर प्रवाहातले इतके पाणी असुनही मी वठून जाईल ...मला आपली मर्जी नाही

मुळांचे संगोपन करून प्रवाह झेलत रहाणे इतके सोप्पे का असते? त्या पेक्षा त्या प्रवाहाची जराशी ओल पुरेशी आहे..प्रवाह जाऊ देत तसाच...आणि बहर असू दे...मोहोर फुलू दे...कधीतरी तो बहर गळेल त्या प्रवाहात...आणि जाईल लांब लांब वहात .पण हरकत नाही न तेंव्हा.कारण त्या मोहोराला कुठे मुळांचे बंधन असते का?...

आणि बघ न हा पाऊस....कसा जुलमी राजवटी सारखा वाटेल तेंव्हा आपला कर लादून जातोय...सहज पणे किना-या वरही भिजता येतय रे...खरच चिंब व्ह्यायला काही पाऊस झेलावाच लागतो...तो ही घराबाहेर पडून असे कुठे जरूरी आहे का?
May 9
..............................................
मुखवट्यांची दुनिया...
मुखवट्यांच्या दुनियेत जेंव्हा पाऊल.टाकले...तेंव्हाच हव्या तश्या मुखवट्यांशी सलगी साधून घेतली...
तिला माहीती होते...ह्या दुनियेत वावरताना.स्वत:ची पण.ओळख विसरायला होणार.आहे.

मग जमवत गेली...एकेका मुखवट्याशी
कितीच जशे होते तशेच समोर आले.
पण काहीच काळ साथ संगत होती
तिला माहीती होते...आज ना उद्या एक तरी खरा चेहरा
..ज्याला अगदी लहान पणा पासूनची ओळख चिकटलेली असेल..आणि तो तिच्यासाठी असेल...भेटणारच
मग ह्या भेटत गेलेल्या मुखवट्यांसोबत काही वाटचाल करून घेतली.
एका वळणावर..तो खरा चेहरा तिला दिसला.ज्या साठी जन्मभराची वाटचाल एकटीने केली होती
ती हरखली...सुखावली
भरभरून जगायला लागली.
हलकेसे पिस..एक फुलपाखरू होऊन
हवेवर स्वार झाली.
कधी निळाई ल्याली.
कधी पावसात चिंब भिजली
कधी चांदण्यांसोबत जागली
कधी मरुस्थळी मृगजळात हरवली

निवडुंगांच्या काट्यात..चेहरा ही फाटून निघू शकतो हे कुठे तिला माहीती होते का?
नव्हतेच....

आता पर्यंत मुखवटे उतरत गेले...आता चेहरा बदलला.
आता ना शोध ना चाहूल.
मुखवट्यांची दुनीया बरी त्यापेक्षा.
त्या काळापुरती तरी खरी असते..ह्या बदललेल्या चेहेर्याला ना मुखवटा बसू शकतो...ना आरश्याला ओळख पटवून देऊ शकतो..

बरे असते मुखवट्यांच्या दुनियेत रमणे

June 9 2015

,......................................................
शब्दांचे दान
देणर्याच्या काही शब्दानी सगळे शब्द का संपून जातात..
.आपलेच शब्द आपल्याशी का फारकत घेतात...
शब्द देउन विसरणारा रमतो आपण का निशब्द होऊन बसतो...
कधी बरसणारे शब्द...
आज बांधाला अडलेले शब्द...
सांगतात खुप काही..
संपले जरी शब्द
आणि हातात असते
उरलेले नाते नि:शब्द...
कधी शब्दानी दिलेली शांतता...
आता उठणारे आवर्त...
.कधी शब्दानी गाठलेला तळ...
आता बोलणे फक्त शब्दापुरत.........
.....सौ गायत्री मुळे
January 9, 2014
................................................................................................................
कालांतरने मनावर झालेल्या जखमांची बोच कमी नाही होत.पण त्या सगळ्या प्रसंगांकडे पहायला एक तठस्थ द्रुष्टीकोन मात्र जरूर मिळतो....काय काय चुका झाल्या ...त्या स्विकारायची हिम्मत मिळते...अर्थात त्याची तयारी प्रत्येकाची नसते..पण अनुभवाच एक गाठोड...हातात ठेउन...मनाच्या तुकड्यांचे दान तो घेउन गेला असतो.
आपल्या स्वाभिमानाला धक्का दे ऊ न पुढे जाणार्या लोकांची आपण कायम वाट बघतो.कारण.
आपण त्यांच्यावर प्रेम करत असतो.
त्याहीपेक्षा आपण स्वत:वर जास्त प्रेम करत असतो.
..
.
गायत्री मुळे
January 28, 2014
.............................................
Gayatri S Muley

चुकुनच हाती आलेले...चिमटीत धरुन ठेवलेले क्षण...त्यांचे फुलपाखरी रंग....
.....आयुष्यात इतके इंद्रधनुष्य येतात ....जातात...खुपदा बेरंग झालेले.क्षण फक्त उरलेले असतात...पण त्या जुन्या आठवणी तितक्याच रंगीत उरतात....कायम....आणि खुप काळानंतर..पुन:त्याच रंगीत क्षणांची भेट...आयुष्य पुन:हरकते....त्या चिमटीतल्या रंगांची पुन:धुळवड करायला उठते....पण रंग आता उरले असतात फक्त चिमुटभर...आणि टिकली एव्हढे....तरी वाटते...घ्यावा ह्याचा वेध...जावे ह्या फुलपाखराच्या मागे ...मग धुळवड तर नाही पण धुळधाण मात्र होते.रंगीत फुलपाखरा मागे धावायचे तर त्याच्यच इतक्या चंचलतेने हे मात्र समजत नाही... प्रत्येक फुलात गुंतुन पडायच नसत हे फुलपाखराला सुध्दा समजते...फुलपाखरु सुरवंटातुनच आलेले असते..पण पंखांनी त्याचे रुप रंगीत करुन टाकले असते....पकडायला गेले तर रंग चिमटीत सुटणारे...(पुन: एकदा)
नाहीतर ते पुढे सरकणारे..फुलाना कुठे जागा सोडता येते का...खालोखाल काटे असले तरी मातीच हवी असते न...मातीच्या गंधाळण्याशी ना फुलाच नाते असते ना सुरवण्टाचे....माती अशीच असते...फक्त रुजवुन घेते...तिथे रुजवात नसते ...मग फुल कोणते अन फुलपाखरु कोणते....ह्या पेक्षा चिमटीत सुटलेल्या रंगांचे भान तिला जास्त असते...तिला जपायचा असतो. फुलपाखराचा रंग...फुलाचा बहर आणि चिमटीत हरवलेले क्षण...
त्या चिमुटभर रंगानी ....इंद्रधनुष्य रंगवुन ...मातीशी नाते सोडुन निघालेल्या फुलाच्या प्राक्तनात फक्त.कोमेजणेच असते.
......गायत्री मुळे.......
22/11/13.......
November 22, 2013 at 10:54pm
---------=-------------------------------

Gayatri S Muley
विश्वास घातच बीज जेंव्हा नात्यात रुजत तेंव्हा ते दो न्ही परत्वे जणवत असत.करणर्याला पण आणी होणर्याला पण करणार्याच मन खात आणि होणर्याच दुखत असत.करणारा खतपाणी घालतो.होणारा मात्र दिन वाणे पणाने त्या विश्वासघाताच्या व्रुक्षाच्या छायेतच स्वत:च्या
उ न्हापासुन स्वता: ला वाचवायचा प्रयत्न करतो.मुद्दम दुर्लक्ष करतो आयुष्य होरपळतच असत.झळा लागतच असतात.पण स्विकारायची तयारी नसते.स्वत:च स्वत: च्या मनाला फसवत असतो..मग समोरचा का नाही फसवणार
September 19, 2013

*******************************


Gayatri S Muley
खूप दिवस गच्च...कुंद वातावरण.एकही पान हलेनासे ...सगळ शांत होत की थिजल्यासारख होत कळत नव्हत.आभाळ दाटलेले पण पावसाचा थेंब नाही..ढग पण सुन्नावल्या सारखे ....करडे सुध्दा नाही...आणि इतके दाटलेले की जस काही एक घट्ट चादर ओढलेली.
....आज ढग करडे झाले....सुर्यदर्शन नाही पण तेज आपो आप बाहेर आले...करड्या ढगामागून रुपेरी प्रकाश बाहेर आला...कुंद पणा संपला.संधी प्रकाश ...हवेची .थंड झुळूक ......हलकीशी पावसाची सर ...आणि काही क्षण दिसलेले पुसटसे इंद्रधनुष्य..
.
कुठेतरी वादळाने हौदोस घातला.कुठेतरी वातावरण सुखद झाले.
October 13, 2014



================================

Gayatri S Muley


ग्रहणा आधीचा आणि नंतरचा चंद्र सारखाच दिसतो...कदाचीत जास्त तेजस्वी दिसतो....मग ग्रहण लागलेले बरेच असावे...निदान ते सुटल्यानंतरचे पुर्णबिंब पहाताना जास्त छान दिसत का?
मला आपल वाटतय की ग्रहण लागायलाच हव....त्याशिवाय ते सुटल्या नंतर चे लखलखत पण तरीही शीतल. असलेले .तेज .अनुभवता कसे येईल?
एक बर असत.न? ..वेधाचा पण विचार केल्या जातो...त्यानुसार नियम ठरवल्या जातात...पाळल्या जातात...मग आलेले ग्रहण सुसह्य होत म्हणे...
आयुष्याच्या ग्रहणाचे वेध अशे आधीच कळाले असते तर खरच नंतर आलेले लखलख तेज आपल आपल्याला अनुभवता आल असत नाही का?

October 8, 2014

**********************************


Gayatri S Muley
कुठेतरी माणुस चुकतो..
.कुठल्या तरी हव्यासापायी .
..काहीतरी मिळावायच ही भावना इतकी तिव्र असते की काय काय गामावल्या जाईल ह्याचा हिशोबच केल्या जात नाही.
हव्यास तसाच उरतो
गमावलेपण फक्त व्यापुन उरत
आणि मुठीतुन सुटलेल्या वाळुच अस्तीत्व जाणवायला लागत
ती साधी सुधी मैत्रीची ऊब किती खरी असते हे समजत
अस्तीत्व व्यापुन उरणारी व्यक्ती गमावल्या जाताना किती हवी असते ते समजत
पण ...हातुन सुटलेला तीर कुठे तरी जाऊन जखम करणारा असतोच न.? ती करतोच...
पण इथे जखमंपेक्षा.....देणारे हातच भळभळायला लागले आहेत
परतावस वाटत...तो हव्यास कधीच माघारलेला असतो
ती ऊब हवी असते ....ते अस्तीत्व हव असते
परतीचे मार्ग बंद झाले तर जागा असुनही उपयोग काय
मग परत जीव त्या हव्यासाकडे झेपावायची भिती वाटते
आता जखमा करण्या इतके सामर्थ्य कुठल्याच टोकदार तिरात नसते
.
..फक्त परतायची जागा हवी असते.
एकदा गमावलेल्या जागी

September 23, 2014


============================

गुलाबाच्या काट्यालाही कौतुकाचा श्वास
बोरीबाभळीचा सोस....कुंपणापुरता
September 22, 2014


*******************************

दगडाला शेंदुर फासला की आपल्याकडे देव तयार होतो म्हणुन कित्येक जण टिंगल उडवतात.
तिथे डोळे बंद करुन एखाद्य हळव्या क्षणी नतमस्तक झालेली एखादी व्यक्ती बघीतली का कोणी?
त्या दगडात त्या देवपणात जितके खरेपण नसेल तितके तेंव्हा त्या नकळत पाणावलेल्या डोळ्यात असत.
इथे आपले प्रश्न पुर्ण संपणार आहेत का हे नतमस्तक होताना माहीत नसत.
पण एक विलक्षण श्रध्दा....असीम विश्वास...हा सगळ्या जाणीवांच्या पलीकडे उरलेला असतो...तो लाखमोलाचा असतो...त्याला तोड नसते.
आणि जेंव्हा ही श्रध्दा पुर्ण शक्तीनीशी कोणाच्या पायाशी ठेवल्या जाते ...तिथे असणारा विश्वास...दगडातही देवपण निर्माण करू शकतो
प्रश्न असतो...फक्त त्या सोबत न दिसणा-या अस्तीत्वावर विश्वास ठेवणा-या श्रध्देचा...
गायत्री...
September 17, 2014




................................................................

आयुष्यात एखाद्या क्षणी खुप हक्क असलेल्या जागेवरून झप्पकन ढकलल्या जातो.
तो.क्षण खुपच विदारक असतो.
आपल आपल्याला सावरता येत नाही
खुप उंचावरून कोसळल्या सारखी अवस्था होते.वेळ हवा असतो सावरायला.आणि सावरणारा हात हवा असतो तो पण तिथुनच..हे किती विचीत्र आहे न?
मग शांत पोकळी....
हळु हळु जाणवायला लागत की आपण एक पायरी होतो फक्त...कोणातरी एखाद्या कोसळलेल्या जीवाची.
ज्याला परत त्या उंचीवर जायचय आयुष्यातल्या ...जिथुन एकदा तिने कोसळण अनुभवलय .
आपण आता एखादी पायरी शोधायची का वर चढायला..????.
.हे प्रत्येकाला शक्य नसत.!!
कारण कोसळण काय असत ही जाणीव जर मनात असेल तर ...कोसळलेल राहीलेल बर.
थिजणे ....हे प्रत्येकाला शक्य नसत
वाहत्या पाण्याला तर नाहीच नाही...मग मिळालेला ओलावा जपत काही पालवी फुटायची वाट पहात तिथेच थांबणे हेच प्रारब्ध असाव का?
...
गायत्री.....
September 11, 2014




....................................................................

Gayatri S Muley
अतिही सुगंधीत नसावी नाती...पुढे येत जाते शिसारी वगैरे...
स्वरा कडुन ह्या कवितेचा audio मिळाला.
खुपदा ऐकला ...
आणि ह्या ओळी पण खुपदा...नुसत्या audio त नाही तर संबंधात येणा-या खुप जणांकडुन
आणि जिव्हारी लागत गेल्या.
अपेक्षा नसलेले नाते ठेवता येत का?नाते तयार होत तेच काहीतरी अपेक्षा ठेऊनच न?
खुप आसुसलेले मन जेंव्हा एखाद्या भावबंधनात गुंतत जात...त्याला शक्य नसत सीमारेषा आखुन घेण...बस...झोकुन द्यायच....वाटेल ते झाल तर...आणि कोसळ झेलायचा असतो....पण झोकुन दिल्याची किम्मत उरत नाही...समोरच्याच्या लेखी आपण विसर्जीत....संपलेलो...आणि आपली गरज ती व्यक्ती....
अश्या वेळेस आपल असण...सारख हजेरी देण...प्रश्न विचारण ...हे नकोस होत....
पण आधी त्याच गोष्टी कौतुकाने घेतल्या गेल्या असतात...मग सवय होते...रीत होत जाण्याची .पण ती जागा रीक्त नसते....आणि आपल मोकळ्या मनानी रीत होण तिला कुठेच भरून पावल्या सारखी जाणीव देत नाही.
रीत झालेल मन मग एव्हढ्याश्या ही जाणीवेने दुखावल.की एका जागी गोळा होत आणि प्रत्येक हाके साठी त्याच एका व्यक्तीला शोधत...
नको असतो तेंव्हा तिथे हे ...
समजत नाही का समजुन घेतल्या जात नाही?ना आपल्याकडुन ना त्या व्यक्तीकडुन
मग ते पोचण....ते पोचवण...
त्या गरजा......त्या अपेक्षा....सगळ ...'अती"...झालेल असत....
तेंव्हा आपल पोचण नाही पोचल तरी चालेल...पण ती व्यक्ती एकदा पोचायला हवी असते
आणि दनकन कानावर ओळ येते.
"अतिही सुगंधीत नसावी नाती...पुढे येत जाते शिसारी वगैरे......
कस शक्य आहे इतक्या गुंतल्या नात्यात आलेली शिसारी सहन होण...
मग फक्त जखमच तेवढी उरते.
...जिव्हारी....
...गायत्री,,,

25 Aug  2014


................................................................

Gayatri S Muley
प्रश्न माझ्यात असतातच.....
...उरलेले..
आताशा तुझ्यापर्यंत पोचत नाहीत ह्याचा अर्थ असा थोडाच की ते नसतात
पण माझ्या प्रश्नानी प्रश्न सुटण्यापेक्षा , त्यातुन नवीन प्रश्न उभे रहात असतील तर ते प्रश्न माझ्या आतच राहिलेले काय वाईट?
आत आवर्तन असतील तर प्रश्न...
किंव्हा प्रश्न आहेत म्हणुन आवर्तन.
कसय न...निरुत्तर करणारे प्रश्न नाही विचारू.पण उत्तर तयार असून ...मिळणार नसेल तर प्रश्नाना काही अर्थ असतो का?
"प्रश्नही माझे ...उत्तर माझे.. माझेच माझे आवर्तनांचे वळसे
सतत जपता माझेच मन मी तुटतात आत आरसे !!"
गायत्री ....
August 6, 2014





......................................................................

Gayatri S Muley
लहान असताना मैत्रीणीने एक कोड घातले.पाटीवर एक रेष काढली.आणि म्हणे हिला धक्का न लावता ही रेष लहान कर
मला जमले नाही
मग तिने त्यासमोर एक मोठी रेष काढली...आणि आधीची रेष लहान झाली
पुढे आयुष्यात अश्या कितीच रेषा लहान करत गेले
एक सल सहन होईनासा झाला की दुस-याची मोठी रेष आखायची
खुप रेषा झाल्या अश्या
पण मोठी रेष एकच असते
'शेवटची '
बाकीच्या लहानच असतात
'उरलेल्या'
कारण त्याला धक्का लावायचा नाही ही पहीली अट असते न
लहान रेषांची खूप गर्दी झालीय आजकाल
..
सौ. गायत्री मुळे
July 4, 2014


...................................................................

Gayatri S Muley
खुप आत असत साचलेले...नेमक जेंव्हा बोलायला जावे शब्द वैर करतात...कितीदा उजळणी झालेली असते खरतर.
अगदी कुठे pause घ्यायचा बोलताना हे सुध्दा ठरलेले असते.
पण दोन्ही कडे शांतता असते...फोन सुरू असतो.
आणि दुसरी कडून प्रश्न येतो,,,
"अजून काय?बाकी?"
खटकन सगळे बटन बंद झाल्यासारख होत.
रेडीओ चा सिग्नल गेल्यावर जस गाण थरथरत ऐकू येत पण समजत नाही तस होत.
बोलणारे दोघ असतात.पण प्रत्येकाला फक्त ऐकायचे असते
अस का होत न?
दोन एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे संवाद साधू का शकत नाही?
त्या अजून मधे खूप काही अपेक्षीत असत
पण तारा तुटुन जातात संवादाच्या
" जूनेच सगळे माझे
कसे सांगू अजून काही
तरी सांगावेसे वाटते
तुझ्या प्रत्येक
'अजून?'ला काही "
...गायत्री.....
July 3, 2014
..............................................................
Gayatri S Muley
कस आहे न...नात नाजूक असले तर चालत..पण तकलादू नको.
एक घाव दोन तुकडे करण फारस कठीण नसत
सर्वतोपरी सुटका होते
एवितेवी त्रास होतच असतो
पण......
कोणी विश्वास ठेवणे...आणि स्वत: तो सिध्द करणे या पेक्षा तो जपणे महत्वाचे असते न..
प्रेम ...मैत्री यापेक्षा जास्त जपावा लागतो तो फक्त कुणीतरी आपल्यावर ठेवलेला विश्वास....
....गायत्री.......
June 24, 2014

......................................................................

Gayatri S Muley
शेवटी संपतोच न झालेला समज गैरसमज....
आणि तो उरलेला राहीला तरी त्याच्या सकट पुढे वाटचाल सुरूच रहाते
काय न अगदी अलगद , हळुवार गुंता सोडवला की नक्कीच सुटतो
पण गुंता खूप घट्ट असला न की पिळ जातच नाही........
मग एक टोक ताणुन ठेवावे लागते..
म्हणजे निदान पडलेला पिळ तरी दिसत नाही
इथे पण सांभाळाव लागतच
जास्त ताणले तर तुटायची भिती असते न?
नाते हवेय न...मग सगळ्या शक्यतांसकट स्विकारायच....सगळ सहज होत
....गायत्री,,
June 21, 2014

...................................................................
Gayatri S Muley
कधी कधी दिवस सुरू झाला अस वाटतच नाही.
रात्रीचेच विचारांचे आवर्तन मनात घोळत असतात.
काल पाहिलेली वाट झोपेतही कुठेतरी आत जागत असते
अलार्म होतो.कामे सुरू असतात.पण कुठेतरी काहीतरी थांबलेले असत.
तुझ्या कवितेची एकेक ओळ जशी आत झिरपलेली असते न तस हे वाट पहाण झिरपत...मुरत....पण संपत नाही...संपाव अस सुध्दा वाटत नाही
कधी कधी दिवस निघाल्या सारखा वाटतच नाही .
...गायत्री....
June 16, 2014

................................................................
कधी कधी हा प्रहर फारच जीवघेणा असतो.एका फोन च्या slight ring ची वाट पहाण्याचा.त्यात कंटाळुन गाणे लावावे
"विविध भारती ",,,,
,गाणे सुरू होते.....
बिन गोपाल भयो ब्रिज सुना ....
.पुन: त्यातही त्याच विरह वेदना .....
एक व्यक्ती जाताना काय काय घेऊन जाते न?सगळ्या जाणीवा...पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र जागोजागी उरलेल्या रहातात ...आणि मागे उरलेला....?? देहाच्या अस्तित्वाने असतो....पण कुठेतरी संपलेला.....
मधुबन सुनो...यमुना सुनी...जसोदा को घर आंगन सुनो...नंद बाबा की अखिया सुनी......सूनी सूनी सर की मटकीया.....राधा रानी को मन सुनो..कहा हो गोपाल......कहा हो गोपाल.....
कसले आर्त आहे ना या सुरात ....डोळे भरून येणार नाही तो वेगळाच म्हणायचा.
मग काय काय आठवत ....त्या भेटी....ते ओले क्षण ...ते दुरावणे (शरीराने) ..आणि मग फक्त आठवणीन्मध्ये जगणे...एकमेकांच्या विचारात जिवंत असणे
सगळे सुने होते हे खरे....
पण ज्या जाणीवा एकमेकांपासुन दूर झाल्यावर होतात त्या सहवासात असताना का नाही होत.कधी चेहर्यावर स्मितहास्य आणणार्या आठवणी...कधी स्वत:च्या नजरेला नजर न देता येऊ देणार्य आठवणी ....कधी हमसुन हमसुन रडवणार्या आठवणी
पण आठवणीच......
एकवेळेस स्वप्न तरी पुर्ण होतील पण आठवणी .....
त्या छळत कायम सोबत असतात पण त्यातला सल कधीच कमी नाही होऊ शकत...का असे न?
स्वप्नांपेक्षा ही त्या जवळच्या असतात पण आपल्या असुनही आपल्या नसतात
..........गायत्री .......
April 25, 2014

.......................................................
सख्या.... .
हरखलास न? आता थोडा स्थिर होऊन विचार करायला हवा न तू? मी आता पुन:कधिही परत येणार नाहीय तुला स्वत:ला स्वत: सावरायचे आहे.. ..तू सैरभैर पालापाचोळा भिरकवल्यागत नको गरगरू.. खूप धास्तावलेला असशील. तूला आधार हवा असेल डळमळणारे आयुष्य सांभाळायला ......पण कुठेही तडजोड करू नकोस. आधीच जोडलेले सगळे तोडले आहे.
तुला खूप बोलाव वाटेल. तुझ्या मनाची हाक फक्त माझ्या काही शब्दांसाठी असेल. तुला असह्य होईल शब्दांचे आधार हवे वाटतील. जग खूप वाईट आहे न तू भावनाप्रधान.. बोलण्याच्या हव्यासापायी नको तिथे शब्दात अडकू नको. मला खूप काळजी वाटते तुझी.
तुला सकाळी जाणवेल माझ नसणे. ओकीबोकी सकाळ घेऊन तू उठशील .सुर्य बिंब पहाशील, माझ good morning करणे तुला आठवेल. ते टाळुन तू पुढे निघ..कारण मी नसले तरी तूझी सकाळ सुरेखच असायला हवी. तू देवासमोर उभा रहाशील..रोजची सवय..पाण्याचा घोट घ्यायच्या आधी देवाला तू धन्यवाद देतोस...आजच्या दिवसासाठी..पण आज नुस्ता उभा रहाशील.एरवि मिटल्या डोळ्यानी तू देवाजवळ कसा पोचायचा मला कधीच समजायचे नाही..आज तू उघड्या डोळ्यानी मुर्ती पहाशील पण संवाद साधू शकणार नाहीस. तुला आठवेल आपला सोबत नमस्कार करणे.सोबत गुढघ्यावर बसणे.मग माझ्या उजव्या तळव्या वर तुझा डावा तळवा ठेवणे.
आता मी नसेल. तो प्रेमातला भक्तिभाव कायम असेल. तू चहात साखर टाकताना गोंधळशील...कधीच अंदाज नव्हता तुला....जेवताना नुसता भात चिवडशील...पण तू नको असा गुंतलेला राहू. तू वळून पहाशील...मी बेसिन जवळ एक पाय मागे दुमडून भिंतीला टेकून उभी असते..त्या कोपर्याकडे...डोळे प्रयासानी कोरडे ठेवशील. दुपारी तू वाचायला घेशील.मन लागणार नाही. नुस्त्या रेघोट्या ओढशील पुस्तकावर. तूला सवय आहे व्यग्र झाला की तू चांदण्या काढतो..मी ओरडते.... तू पान दुमडशील...पुस्तक छातीवर ठेऊन आरामखुर्ची वर रेलशील.
तू असा असंबध्द व्यग्र नको होऊ रे सध्याकाळी तू कातर होशील. हळवा होशील. वारंवार बेचैन होऊन देवघरासमोर जाशील. निरांजन मी कायम तेवत ठेवायची. आता तू ठेवतोस..उगाचच वात वर करशील...काजळी काढशील.ज्योतीकडे पहात शांत बसशील...तुला आठवेल माझ सांगणे..तिन्ही सांजेला उदासवाण बसू नाही. तू एकही तक्रार करणार नाहीस देवाकडे.. मी तिथे नसेल रे.
मग ही अंगावर येणारी रात्र. तू माझी चादर उघडशील...खांद्यापर्यंत ओढशील. काहितरी विचार करत... तू विनाकारण उठून घोट घोट पाणी पिशील. कधी तू रेडिओ ऐकशील...दोन ओळी झाल्या गाण्याच्या की स्टेशन बद्लशील. मग फोन हातात घेशील.......गाणे ऐकणे माझा अगदी हळवा विषय....एरवी तू टिंगल उडवायचास..प्लेलिस्ट पहाशील. पुन: एकदा घड्याळ पहाशील.... रात्र खूप मोठी वाटेल न तुला?
तू पुन: गाणे बदलवशील. माझी आवडती गझल लावशील... "रंजीशही सही दिल ......" डोळे मिट्शील..मागे उशिला रेलून बसशील. "आ फिर से मुझे छोडके जाने के लिये आ" तुझ्या डोळ्यातून सगळा दिवस आता पाझरायला लागेल. नको रे.....मी तिथे नसेल.
March 11, 2014
..........................................................
...... तू ला....

आपण भेटलो बघ...आठवत का तूला?....देऊळ होते तिथे...तू म्हणे आता काय? मी म्हणल चल तिथे बसू न मंदिरात...तुझा सावध पणा...नको कोणी ओळखिचे आले तर?,,तेंव्हा खर तर दुपारची वेळ..आडरास्त्यावरचे...गावातले मंदिर...गाव अनोळखी...मग आपल्याला कोण ओळखणार होत? पुजारी ओळखत असेल तर?...तुझी शंका....म्हणल ...निदान दर्शन घ्यायचे का?...

तू कसाबसा तयार झाला. सोबत चालतच नव्हतो आपण....तू निदान 20/25 पाऊले पुढे...मी फरफटत मागे...मी पायर्या चढुन दमछाक करत गाभार्यासमोर पोचली...दत्तात्र्येयाचे मंदिर....हसू आले त्याही स्थितीत...आणि टचकन डोळे भरून आले.....कारण आता हे हासणे संपणार आहे हे मला जाणवत होते.. मी तुझ्या बाजूला येउन उभी झाली..तुझ्या डोळे मिटलेल्या चेहेर्याकडे एकटक पहात...तुला जाणवली माझी नजर...की बोचली.?

तू पहातो लक्षात आल्यावर मी तुझ्या बाजुला उभी राहुन डोळे मिटले...न देवाला हात जोडले...तू वस्सकन वसकला .....काय एकेक नाटक करतेस तू?,,,हे अस देवा समोर जोडिने उभ राहीले म्हणजे आपण एक होणार नाहीय.लक्षात घे तू... मी कसनुस हसली...तू पुढे निघाला...मी तुझ्यामागे...प्रदक्षिणा मारायला. माझा पाय अडकला...मी पडत होती....तू वळुन सावरले...सांभाळ स्वत:ला....plzz....मी कस करू सांग ग? मी अगदी अचंभीत..वाटत होत...कंटाळुन हे नात तोडतो आहेस...मनात तर दुखत आहेच तुझ्यापण...मग हा उर्फाटा निर्णय का एकमेकांपासून दूर व्हायचा?....लागल का ग? मी मानेनीच नाही म्हणल.....खर सांग....मी वर तुझ्याकडे रोखून पहात म्हंटले...ठेच जोरातच लागली आहे...कळ येइलच न?..

तू नजर चुकवून पुढे....प्रदक्षिणा पूर्ण करायला...मी तुझ्या मागे... मग तू म्हणे तिकडे बसू...झाडाखाली...तू राजगिर्याची चिक्की आणली होतीस...मला म्हणे घे उपवास आहे न तुझा. इच्छा नव्हती अजिबात. मी ती पर्स मधे ठेवली...पुढे काही दिवसानी..ती नरम झाली ... झाडाखाली बसलो..पुन:हातभर अंतर.....माझी नुसती कासाविशी...एकदा तरी तू जवळ घ्याव आणि मी हमसून हमसून रडाव....पण तू कसला एव्हढा निश्चय करून आलेला की नजरेला सुध्दा नजरेचा स्पर्श होवू दिला नाहीस...मी अगदी त्रुशार्त....तुला समजत असून तू सगळ्या जाणीवाना कुलूपे घातलेली...अर्थ नव्ह्ता एकतर्फी संवाद वाढवण्यात......

बोलणे चालू असे पर्यंतच थांबलेल बर असत न? निदान ही जन्मभराची जखम तरी उरात उरलेली नसती राहिली....

मीच निरोप घेतला....बस मध्ये बसली.....दर्दभर्या आवाजात गाणे वाजत होते कुठेतरी...."बावरा मन देखने चला एक सपना", वळुन पाहिल तर तू माझा अखेरचा निरोप घ्यायला सुध्दा थांबला नव्हता..... आत्तापर्यंतचा बांध अगदी सहज कोसळला..मी हमसाहमशी रडायला लागली.... एकटीच....गर्दीचा एक भाग होऊन

सौ.गायत्री मुळे.
Mar 7, 2014 ·
...........................................................
एखाद्या गोष्टीचा जेंव्हा ओघ सुरू असतो
..ओघा ओघात आपण खूप अहारी जातो..
आणि ती सुटते...
मग तो काळ अगदी कठीण.अगदी सैरभैर....
मग त्या ओघात केलेल्या सगळ्या गोष्टींची भयंकर चीड निर्माण होते.....
आणि त्या टाळून पुढे जाणे सुरू होते...
काळ जातो.
वळुन पहा.
तिथे अजूनही मन तितकच गुंतलेल असत...
कदाचीत जास्त.
कारण आता तटस्थ द्रुष्टीने पाहिल्या जात...
ओघाओघात संपणारी ती गोष्ट नसतेच..
फक्त प्रवाह बदलतात.
गायत्री...मुळे
March 7, 2014

.....................................................................
आज तुझ्या जगाचा मी पण एक भाग झालीय....शुगर निघालीय.....फार नाही पण ...एन्ट्री झालीच....अस वाटले..ह्या गोड बातमीत तुला सामील करून घ्यावे...मग फोन केला...एकच रिंग....मिस कॉल दिला... मला काय माहिती नव्हते का की अजिबात रीसपोंस येणार नाहिय....
पहिल्यांदा माझा अपेक्षा भंग केला नाहीस तू....आनंद मानू का? एकेक प्रसंग....अगदी आत्ता घडल्या सारखे पुन: डोळ्या समोर आले.... त्यात तुझ ते वाक्य.....मेलीस तरी कळवू नको...बाकीचे कळवतीलच...तरी मी ही हळु हळू मरणाकडे सरकवणारी गोड बातमी तुला द्यावी म्हणुन मी फोन केला. असे वाटले होते तू परतून फोन करशील..मग मी तुला सांगेल...आणि तुला वाईट वाटेल...मग मला खरे रडू येइल आणि थोड समाधान की माझ्या दु:खाने तुला वाईट वाटले... तेही दिले नाहीस......
शेवटची भेट आठवते अजुनही....मी अगदी कोसळायच्या बेतात...वाटत होते तू सांभाळुन घ्यावे....तुला जाणवाव्या ह्या यातना... तू फक्त चार बोटाच्या अंतरावर देहाने ...आणि मनाने ...सापडतच नव्हतास...मी अगदी गदगद सगळ विश्व हलवले...पण तुझ्या मनाला पाझर फुटला नाही.....तू म्हणे...एककांवर विश्वास हा याक्षणी फक्त महत्वाचा आहे.....अर्रे पण दूर होणे जरूरी होते का.? तू आला सुसाटत...तुझ्या मर्जिने...गेला रोंरावत तुझ्याच मर्जीने...फक्त वादळ...उध्वस्त करणारे...अंतर्बाह्य.......मला माहिती होत आता सावरणे नाही.....तुझ्या मर्जीने आपले सगळे मनो व्यापार झाले....तुला हवे तशे...मी केंव्हाच कुठेच नव्हती... तू अगदी दुष्टा सारखा मला दिलेला फोन आणि सिम परत घेतले...काळजाचा तुकडा होता....तुझा नंबर बदलणार नव्हताच न? पण ही खुणगाठ होती न...तू बांधुन दिलेली. पिळ सगळा माझ्याच पदराला पडला न? तुला होते तशी मलाही खूप बंधन होते... कदाचीत तुझ्यापेक्षा जास्त....पण मला स्व्त:ला नुसत झोकून देणे माहिती होते....आणि तुला तर प्रत्येक पाऊल अगदी जपून टाकयची सवय.. .
तुझ्या मुळे लागलेली रामरक्षेची सवय...सुटणार आहे का शेवटच्या श्वासापर्यंत?,, मग हे दूर होणे कशाला? मी कुठे तुझ्या कर्तव्याच्या आड येणार होती,? मला जसा तुझ्या असण्याचा आधार असायचा तसा तू माझ्या नसण्याने शांत होणार होता कदाचीत....पण खूप टोचून गेल सगळ...आयुष्यभरासाठी... पुन: उभे रहायचेच नव्हते...आता तर संध्याकाळ होतेय आयुष्याची...... एखाद्या व्यक्तीवर जेंव्हा सर्वस्व अर्पण करून प्रेम केल जाते न...तेंव्हा तिथे ...तन ..मन .. धन... श्रध्दा... विश्वास... बुध्दी...
शक्ती...भक्ती...आनंद...ह्या सगळ्या जाणीवांच विसर्जन असत.
मनाचा देव्हारा ओकाबोका करत तू निरोप घेतलास...फक्त स्वत:च्या इच्छेनी....तोच क्षण ठरला आयुष्य थिजण्याचा......
तुझ्या पायातल्या बेड्यांच ओझ माझ्यापण खांद्यावर होत तुला चालणे अवघड मला झुगारणे कठीण होत.
वणवा तुझ्या नशिबी निखारे माझ्या पदरात माझ मात्र आयुष्य उभे पेटलेल रान होत.
तुला जमणार नाही कधीच झोकुन देण अस्ताव्यस्त, माझ्यासारख्याना स्वत:ला मोडुन घेणच येत...... तुझीच,,,,(?),..
.मी.... .
February 28, 2014
...............
.......................................................................Gayatri S Muley
.....
सुख आपसुक मिळाले की ते जपता येत नाही
मिळणे कठीण झाले की मिळवायची धडपड सुरू होते.
अप्राप्य झाले की तडफड
हळु हळू दु:खाशी नाते जुळते.सहन करण्याची ताकद येते.
सवयिने त्रास संपतो
........
मग सुख दोन्ही हात पसरून आले तरी नको असते.
कारण दु:खाची सवय अंगवळणी पडलेली असते.
....
गायत्री.....
....................................................................
March 1, 2014

एका वळणावर वळुन पहायची वेळ येतेच.आपल्याच आयुष्याकडे....कारण तिथे थिजलेपण आलेले असते.तेंव्हा सामना होतो अश्या कित्येक क्षणांचा जे सुटलेले असतात.काही हिरमुसले क्षण.काही तिष्ठत असलेले क्षण.काही नकाराचे क्षण....काही क्षणांचा नकार....आणि येतील त्या अडचणीना तोंड देत पुढे सरकलेले आयुष्य..आपलेच असते...पण ह्या वळणावर परके भासणारे...खुप हात सुटले असतात...खुप सोडले असतात...कधी परिस्थितीवर मात केली असते...तर कधी परिस्थिती अवाक्याबाहेर गेली असते.
आपलेच आयुष्य असते...आणि ते कायम आणखी कोणासाठी तरी उधळलेल असते....काही क्षण मिळणार्या तात्पुरत्या आनंदासाठी.....झालेले विसर्जन.......प्रत्येकाला ह्या सगळ्या क्षणान्मधुन कधीतरी जावेच लागते.
आयुष्य अगदी परिक्षा घ्यायला उभे असते..पावलो पावली.
...ठेचकाळत...सावरत...सरकत तर कधी रेंगाळत...पुढे जात जात येत हे वळण....एकदा पुन: वळुन पहायला लावणारे.
...अवती भोवती
............असतात अनेकजण
आपापसात गुंतलेले
.............हिरमुसले क्षण
भोगतच असतो प्रत्येकजण
...........घोळक्या मधले एकटेपण....
सौ..गायत्री मुळे.......
February 5, 2014

....................................................................................................."


कोरा कागद फिक्की शाई अजून डाव आला नाही बोला आधी नदी की पहाड ? !!
बोली की मुकी?
ओली की सुकी ?"
.....
किती सहज शब्द.....लहान पणी ह्याचा काही अर्थ कळाला नसेल.दोन गटात गडी वाटून घ्यायचे असले की अस आम्ही म्हणायचो.मग कोणाला कोण गडी हवा हे त्याने ठरवून तसे सिलेक्ट करायचे.ज्याची वाटणी होत असेल त्याला काही चॉईस नसायचा की त्याने कोणाच्या पार्टीत जायचे.मग खेळ सुरू व्हायचा.
.मग भांडणे मग समेट....आणि मग सांगता
उद्या परत selection .आणि नवा नवीन वाटणी
कोरा कागद फिक्की शाई.....!!!!!
कोरा कागद मिळेल.पण शाई सुध्दा फिक्की मिळेल....फिक्क्या शाईने को-या कागदावर लिहीलेले कितीसे टिकून असणारे होते?
म्हणूनच अजून डाव आला नाही ...
वेळ आलेलीच नसते...ती आपण 'नदी ..म्हणतो की पहाड ह्यावर ठरली असते..नदी वाले एकीकडे......पहाड वाले एकीकडे.मग सगळे गडी वाटून झाले की कळणार आपण कोणाच्या वाटेला गेलोय...किंव्हा आपल्या वाटेला कोण आलेय.
खेळात फक्त "चकायसाठी"म्हणलेल्या काही ओळी...आयुष्यात ब-याच गोष्टींचे गमक सांगून जातात.
ओली का सुकी....बोली का मुकी....
ह्या ओळीनी तर सगळा मतितार्थ मांडल्या सारखा वाटतो.
ओले नाही तर सुके....आयुष्य कसेही असले तरी ते सरणारे.
बोली का मुकी.....बोलून पार पाडा किंव्हा मुकाट्याने पार पाडा....
तेंव्हा काही कळत नव्हता अर्थ....कदाचीत मी काढला तसा नसेलही
कदाचीत त्या ओळी तश्या नसतीलही..पण आज सारख्या आठवत होत्या
""कोरा कागद फिक्की शाई अजून डाव आला नाही""!!!!
,.गायत्री........


*************************************




काही काही गाण्याना खरच सुगंध असतो ...किंव्हा एखाद्या सुगंधाच्या मागोमाग एखादे गाणे ओठावर कधी रेंगाळायला लागत कळत सुध्दा नाही...लग्ना आधी नाही ...त्याही आधी......म्हणजे कॉलेज ला असताना...आमच्या अमरावतीला रेडीओ स्टेशन नव्हते.टि व्ही सुध्दा नव्हता.मग करमणूक म्हणजे एकच कॅसेट ऐकणे...एक two in one घेतला होता आईने...त्यात रेडीओ आणी कॅसेट वाजायच्या...मग खूप कॅसेट जमविलेल्या....आज एका मैत्रीणीशी बोलता बोलता कितीतरी जुन्या गाण्यांची उजळणी झाली....लता मंगेशकरांची 'श्रध्दांजली'ही कॅसेट आठवली...त्यातले...'ये नयन डरे डरे .....जाऊ कहा बता ऐ दिल.....'हे गाणे.
गुणगुणताना डायरेक्ट त्या चाळीत घेऊन गेले.तेंव्हा कूलर नव्हते...ओळीत चार घराच्या अंगणात पलंग टाकलेले.... आणि कॅसेट प्लेयर लावलेले..मुद्दाम संध्याकाळ पासून टाकून थंड केलेल्या गाद्या..एखादी जाणारी कुल्फीची गाडी...दोन कुल्फ्यांचे केलेले सारखे भाग....आणि काय काय............अंगणात गादीवर पडल की आकाशात असंख चांदण्या दिसायच्या..........बुढीच खाटल...सप्तर्षी...काय आणि काय...त्यातला सगळ्यात चमकता तारा म्हणजे आपले दादा...अस ताईने सांगून ठेवलेले..
मग काही दिवसानी वॉकमॅन घेतला...त्यात पहीली कॅसेट टाकून ऐकलेले पहीले गाणे..'जब कोई बात बिगड जाये'...ते दिवस अजूनच सोनेरी होते...ती कॅसेट पण खूप खास होती....
मुद्दाम अंगणात पाणी टाकून थंडावा तयार करायचो आम्ही.मग पलंग टाकायचे...तो जो मातीचा वास यायचा तो आज ह्या गाण्यांच्या आठवणीने परत मनात दरवळायला लागला...मन त्या चाळीतल्या छोट्या कौलारू घरात जाऊन पोचले....तिथला तो बांधीलकीचा सुगंध मनात पसरत गेला...
आजची संध्याकाळ सुरेख करत गेला.*

No comments:

Post a Comment