Tuesday, June 4, 2019


दिवाभिता सारख लख्ख उजेडाला भित भित आयुष्य घालवायच. ऱात्रीच्या अंधारात काही तरी चाचपडत रहायच आणि अश्या व्यक्ती कडून अपेक्षा करायच्या जिची छाती फक्त गर्वाने फुगलेली आहे. . बेधडक तोंड का देता येऊ नये आरोपाना? दोष नाहीय न? मग कश्याला बुक्क्यांचा मारा सहन करतो आपण? संस्कार संस्काराच्या नावाखाली फक्त काय तर भित्रट पणा आणि पळपुटे पणा केल्या जातोय का? निदान ज्या व्यक्तीचा मान ठेवायच्या नावाखाली  हे सगळ केल्या जात आहे ती त्या लायकीची तरी आहे का? हे न कळण्या इतपत तर निर्बुध्द नक्कीच नाहीय  न? मग तरी का? कारण मनाला कुठेतरी कुबड्यांची आवश्यकता आहे .... कोणीतरी ठासून बाजू घेऊन भांडणार हव आहे. आणि ह्या अपेक्षेत अजूनच मनाची फरफट होते आहे. .. मग मन तिथून निघत आहे आणि बेईमानी करायला लागत आहे.   त्यातही तुकडे कश्याचे? तर स्वत:च्याच मनाचे. हा सगळा झगडा फक्त अस्तित्वाचा आहे. आणि ते कोणीतरी कौतूकानी गोंजाराव म्हणूनच इतका आटापिटा आहे न? दगडावर डोक आपटून उपयोग नाही हे कळत असूनही परत परत तोच लोचट पणा का? 

मग तराजू घेऊन...  गेलेला काळ, केलेले कष्ट आणि स्वत:चा हिरमोड तोलल्या जातो. कष्ट कोणाला स्मरणात नसतात ... तेंव्हा मारलेले मन तिथेच गुदमरत पडलेले असते आणि आज साठी तिथे जागा नसते. वर्षानूवर्षांच्या पांढऱ्या रेषांवर एक काळी आणि मोठ्ठी रेष ओढलेली असते. ती पुसायला गेल की सगळच काळ होणार असत. मग बोलू द्याव ज्याला त्याला जीभ टाळ्याला लाऊन?  

जी ओळख इतके वर्षात पटवायचा प्रयत्न केला असतो ती काळी होऊन समोर येते. दहा जणांच्या नजरेत फक्त अपेक्षा असतात चौकट तोडू नये म्हणून आणि आपणच आपले मनभर एक अपराधी पण सांभाळत इतरांचा अहंगंड कुरवाळत बसतो. 

तिथे कोपऱ्या कोपऱ्यात खाणाखुणा असतात मन मारल्या नंतर मिळालेल्या कौतुकाच्या. आणि आत अविरत एक झगडा सुरु रहातो मी आज आहे तस मला स्विकारा... 

माझ मन तेच आहे... तुमच्या काळ्या रेषा कमी करा.

गायत्री 
४/६ /२०१९ 

Thursday, April 18, 2019

पोकळी असतेच न प्रत्येक मनात?  मग ती भरून काढायला कुणाचा तरी आधार घेण कितपत योग्य ठरत?   अंगावर येणारा वेळ घालवण्या साठी कुणाशी बोलणे कितपत योग्य ठरत? मात्र आपल्या मुळे कुणी फशी पडतय ही जाणीव झाली की थांबणे नक्कीच योग्य ठरत.  न सरणाऱ्या रात्री  चांदणे नाही वेचू नये.
कारण त्यावर जरी अधिकार दिला असला तरी ती रात्र कुणाच्या तरी वाटेत खोळंबलेली असते. पावले मग तिकडेच वळणार असतात. अश्या क्षणी उगा  कुणाचा रस्ता  का चुकवावा एखाद्या चकव्या गत?  आणि भान असणे ही काही चूक तर ठरतच नाही न? स्वत: च्या मनाचे चोचले कितपत पुरवावे?

 " गेले द्यायचे राहूनी तुझे  नक्षत्रांचे देणे " 

        हे देणे फक्त एका चांदण वेळे साठी असावे.  तितकेच खरे.

मग चूक तर नक्कीच होती. वाटेवरच्या प्रवाश्याचा मुक्काम चुकवून चकवा लावणे हे नक्कीच चुकीचे. सावध असणे चूक नाहीच.

सगळ्या चांदण वेळा सगळ्यांसाठी नसतात. पण प्रत्येकाचा प्रहर मात्र ठरलेला असतोच.

,   गायत्री ............

Sunday, March 10, 2019

मृगजळ

इतकेही गुंतायचे नव्हतेच मला की
क्षुल्लक आठवानी  मनात जळवा लागाव्या
आणि तुला तितकेच  लांब ठेवायचे होते
ज्याने  माझा श्वास न गुदमरून जावा

एका बेसावध क्षणी
नकळत रंध्रारंध्रात गोठत गेलास
श्वासाच्या लयीत एक
धुंद संगीत बनून बरसत राहीलास

मला सवय होती  मृगजळा ची
तहान भिनत होती आतात आभासाची

चिमटीतल्या फुलपाखराचा रंग
असा कायमचा बोटाला कसा लागू शकतो?
वादळाच्या पाठोपाठ फक्त
विनाश घोंघावत  असतो

मी रिक्त रिक्त तरी भारावलेली
उसन्या सुखा मागे उरफोडत धावत निघालेली

खोल एका तळघरात
कुलूपा आडचा कोपरा  होता
धूळ भरल्या वाटेवरती
कुणा पायाचा वावर होता

आताशा कुठल्याच पवित्र जाणीवेने
शहारा उमटत नाही
लाटे सकट वहात आलेला गाळही
किनाऱ्यावर ठैरत  नाही

कदाचीत  इतकी रुक्ष
 मी पहिल्यांदाच असावी
कुठलीच ओल आता
माझ्या पापणीत उतरत नाही

गायत्री ......