दिवाभिता सारख लख्ख उजेडाला भित भित आयुष्य घालवायच. ऱात्रीच्या अंधारात काही तरी चाचपडत रहायच आणि अश्या व्यक्ती कडून अपेक्षा करायच्या जिची छाती फक्त गर्वाने फुगलेली आहे. . बेधडक तोंड का देता येऊ नये आरोपाना? दोष नाहीय न? मग कश्याला बुक्क्यांचा मारा सहन करतो आपण? संस्कार संस्काराच्या नावाखाली फक्त काय तर भित्रट पणा आणि पळपुटे पणा केल्या जातोय का? निदान ज्या व्यक्तीचा मान ठेवायच्या नावाखाली हे सगळ केल्या जात आहे ती त्या लायकीची तरी आहे का? हे न कळण्या इतपत तर निर्बुध्द नक्कीच नाहीय न? मग तरी का? कारण मनाला कुठेतरी कुबड्यांची आवश्यकता आहे .... कोणीतरी ठासून बाजू घेऊन भांडणार हव आहे. आणि ह्या अपेक्षेत अजूनच मनाची फरफट होते आहे. .. मग मन तिथून निघत आहे आणि बेईमानी करायला लागत आहे. त्यातही तुकडे कश्याचे? तर स्वत:च्याच मनाचे. हा सगळा झगडा फक्त अस्तित्वाचा आहे. आणि ते कोणीतरी कौतूकानी गोंजाराव म्हणूनच इतका आटापिटा आहे न? दगडावर डोक आपटून उपयोग नाही हे कळत असूनही परत परत तोच लोचट पणा का?
मग तराजू घेऊन... गेलेला काळ, केलेले कष्ट आणि स्वत:चा हिरमोड तोलल्या जातो. कष्ट कोणाला स्मरणात नसतात ... तेंव्हा मारलेले मन तिथेच गुदमरत पडलेले असते आणि आज साठी तिथे जागा नसते. वर्षानूवर्षांच्या पांढऱ्या रेषांवर एक काळी आणि मोठ्ठी रेष ओढलेली असते. ती पुसायला गेल की सगळच काळ होणार असत. मग बोलू द्याव ज्याला त्याला जीभ टाळ्याला लाऊन?
जी ओळख इतके वर्षात पटवायचा प्रयत्न केला असतो ती काळी होऊन समोर येते. दहा जणांच्या नजरेत फक्त अपेक्षा असतात चौकट तोडू नये म्हणून आणि आपणच आपले मनभर एक अपराधी पण सांभाळत इतरांचा अहंगंड कुरवाळत बसतो.
तिथे कोपऱ्या कोपऱ्यात खाणाखुणा असतात मन मारल्या नंतर मिळालेल्या कौतुकाच्या. आणि आत अविरत एक झगडा सुरु रहातो मी आज आहे तस मला स्विकारा...
माझ मन तेच आहे... तुमच्या काळ्या रेषा कमी करा.
गायत्री
४/६ /२०१९
No comments:
Post a Comment