गझल

Gayatri S Muley

काय मागू काय नाही काय उरले बोलणे ते
बोल किंव्हा तोल तू ही टाळ काही टाळणे ते

शोध हा होता कुणाचा जन्मभर जो चाललेला
साधले मी जर हवेसे संपवू का शोधणे ते

देत गेले सर्व काही सार्थ केले दान माझे
काय होते आपले मग सोड आता मागणे ते

रात गेली स्वप्न माझे थांबलेले पापणीशी
ऐन जात्या सांजवेळी टाळ आता भेटणे ते

काल जेंव्हा सोडली तू साथ माझी एकटीची
जन्म गेला शांत चित्ती काय आता वाटणे ते

आज केला खूप कल्ला त्या कधीच्या भावनांनी
सांग त्याना संपले रे काय होते भांडणेे ते

एक होता काजवा अन रात्र थोडी शांतलेली
ऐन वेळी घात झाला लुप्त झाले चांदणे ते

मोह केला जानकीने पाहता मृग कांचनाचा
त्यागला जर राजवाडा का न जमले टाळणे ते
..
सौ..गायत्री.मुळे.

February 7 ,2015

....................................................................
...Gayatri S Muley
काहूर का असावे दाटून सांजवेळी
का ओढ ती नसावी आतून सांजवेळी

कसला हिशोब होता रात्रीत चांदण्यांचा
अंधार दाटलेला त्यातून सांजवेळी

गेला दिवस तसाही पाहून वाट थोडी
आधार घेतला तू काढून सांजवेळी

होता मना दिलासा साधेल शकुन थोडा
उद्गार भोवणारे टाळून सांजवेळी

पाऊस आज झाला थैमान घालणारा
प्राजक्त शांत माझा सोसून सांजवेळी

दाबून आत होत्या त्या भावना कधीच्या
आवाज ऐकले मी आतून सांजवेळी

गेला कुठे कळेना प्राजक्त तो सुगंधी
बेधुंद माळताना वेचून सांजवेळी

दानात काय देऊ हातात काय माझ्या
पांथस्त बैसला तो येवून सांजवेळी

कोंडून ठेवलेला आवाज मी कधीचा
अस्तीत्व मी पहाते तोलून सांजवेळी

दे जन्म एक वेडा जो पाशमुक्त साधा
हुंकार मागणीला देऊन सांजवेळी

लांबून सावलीचा घेऊन वेध जेंव्हा
थांबून परतले का ते ऊन सांजवेळी

मोडीत टाकलेला स्वप्नस्त भाव माझा
मुद्दाम आज गेला भेटून सांजवेळी

नाचून घेतले मी सोडून लाज सारी
नाजूक कात माझी टाकून सांजवेळी
.
गायत्री....
February 19 2015


..............................................................
उत्तराला अर्थ नाही वेळ गेली आज त्याची
थांबलेला त्याचसाठी फक्त माझा प्रश्न नाही
..
गायत्री....

...........................................................
Gayatri S Muley

अस्वस्थ अंतरात्मा काहूर पेलवेना
आतून भेटणारा आनंद मानवेना

नाजूक भावनांची रेशीम गाठ झाली
गुंता कसा मनाचा होतो मला कळेना

सोडून सोडवेना ती गाठ का पडावी
आयुष्य वेचलेले पण वीण सांधवेना

पाऊल खेचले मी मागे मुकाट माझे
रस्ता तसाच आहे मुक्काम गाठवेना

गात्रे शिथील झाली रस्ता अजून बाकी
ओढून जोर कैसा पायात आणवेना

दु:खात गाइलेले गाणे न आज बाकी
अंती मला सुखाचा झंकार ऐकवेना

राखून ठेवलेले आताच बोल काही
संपून वेळ गेली संवाद साधवेना

देता जरा खुणा मी स्मृतीस आठवांच्या
अव्यक्त वेदनेचे आभार मानवेना
.
गायत्री.

April 21 2015
.............................................................
Gayatri S Muley
सरली तरी कळेना का जिंदगी मला ही
अभिमान जपत गेली की काळजीत गेली
December 2, 2014

*******************

Gayatri S Muley

खेळात आज माझ्या मी बाद का कळेना
जिंकून हारण्याचा मज नाद का कळेना

आतून अर्थ परके ओळीत भाव नाही
देऊ खुल्या मनाने मज दाद का कळेना

संपून काल गेले जे आपलेच होते
चालू अजून कैसा हा वाद का कळेना

काहीच सांगण्याला शब्दात जे उरेना
मौनात घातलेली मज साद का कळेना

कित्येक आजवर त्या थापाच ऐकल्या मी
निवडुंग सांगणारी फिर्याद का कळेना

आवाज तोच होता कोणास मी दिलेला
संपून आज गेला संवाद का कळेना

ओघात बोलण्याच्या नाहीच मी तुझ्या रे
आले उगाच तुजला मी याद का कळेना

मौनात काल केली भाषांतरे कश्याला
आला पुढे मनाचा अनुवाद का कळेना

...गायत्री...मुळे

October 31

*****************************************************************
ऐकले मी नाव माझे जोडले जाते तुझ्याशी
ओळखीचे हासण्याला टाळले तू कैकवेळा
.
गायत्री ........
August 5 at 7:07pm
**************************************************************

वाटेत सोडताना सांगून मात्र जा तू
वै-या समान तेंव्हा वागून मात्र जा तू

नाते जणू निखारा पोळून हात गेला
माझी ललाटरेषा पाहून मात्र जा तू

अर्धे अजून आहे बेधुंद स्वप्न माझे
स्वप्नात मुग्ध माझ्या झिंगून मात्र जा तू

पूर्णत्व मागते मी , भाग्यात ना जरीही
खेळात डाव अर्धा मांडून मात्र जा तू

ही वेदना जिवाला जाळेल काळरात्री
अंधार दाटलेला प्राशून मात्र जा तू

आजन्म साध दावा श्वासा गणीक माझा
थोडी फुले च अंती वाहून मात्र जा तू

होती जखम जराशी जन्मास झोंबलेली
खाणा खुणा तिच्याही पाहून मात्र जा तू

घेतो म्हणे तुझा तू सन्यास भावनांशी
जीवंत पाश सारे सोडून मात्र जा तू

देता उगाच झाला तो शब्द लाघवी तू
अर्थात गुंतण्याचे टाळून मात्र जा तू .

.सौ...गायत्री मुळे....
July 6 at 7:06pm

No comments:

Post a Comment