Wednesday, May 28, 2025

हस्तलिखित

 


इतकी वर्ष लग्नाला झाली आणि आता ह्या घराचा पाया खचायला लागला होता. जुनं बांधकाम, नक्षीदार लाकडी बांधकाम होतं. समोर मोठं अंगण, दारात नारळ, आणि लिंबाची झाड होती. आजूबाजूला असलेल्या मातीच्या जागी गुलाबाची रोपं लावली होती. मधल्या भागात इतक्यातच फरशी बसवून घेतली होती. तिला हे घर पाडायच्या विचारांनी मधूनच खूप वाईट वाटायचं. ह्या सगळ्या गोष्टी आता नेस्तनाबूत होतील, आणि सगळ्या फक्त आठवणी उरतील ह्या विचारांनी तिचा जीव कासावीस व्हायचा. पण अक्षरशः इलाज नव्हता. जुनं आणि लाकडी बांधकाम असल्यानं कालांतराने घराला उधळी लागली होती. छत कुचकामी झालं होतं. मयाली ठिकठिकाणी पोखरल्या गेल्या होत्या. वरच्या मजल्यावर कोणी चाललं की खाली भसाभसा माती पडायची. भीती वाटायची की त्या मातीसोबत वरून कोणी खाली यायला नको. 



         सासूबाईंनी घर पाडायचा विषय निघाल्यानंतर अतिशय चिडचिड सुरू केली. हिच्या स्वतःच्याच जिवाचा त्रागा होत होता, त्यामुळे ती त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. अशात एके दिवशी आलेल्या अवकाळी पावसाने आणि वावटळीने आतून उधळीनं पोखरलेलं नारळाचं झाड, एखाद्या पत्त्याच्या घरासारखं आडवंतिडवं कोसळलं. गोठ्यात असलेल्या टिनावर ते पडलं. नशीब रात्रीची वेळ असल्यानं त्या झाडाखाली कोणाचा वावर नव्हता. आणि गोठ्यातसुद्धा कोणाला इजा झाली नव्हती. मात्र त्या घटनेनंतर सासूबाईंनी त्यांचा हेका सोडला आणि घराचं नवीन बांधकाम करायला परवानगी दिली. त्यासाठी जुनं घर पडावं लागणार होतं आणि त्याआधी सगळं समान हलवण्यात काही दिवस जाणार होते.  



      तिने मुलांना हाताशी घेऊन थोडं थोडं सामान हलवायला सुरुवात केली. एक दिवस खूप जुनं लाकडी कपाट सासूबाईंच्या खोलीतून बाहेर आणलं. पोरं म्हणे आई हे काही बघू नको. ह्याला उधळी लागली असेल; तर ती सगळ्या घरात पसरेल. हे असच्या असं जाळून टाक. पण तिला माहिती होतं त्या कपाटात किती मौल्यवान ऐवज आहे. तिने त्यादिवशी मुलांना बाहेर जाऊ दिलं. आणि ते कपाट उघडलं.



भर टळटळीत उन्हात बसून ती त्यातल्या एकेक वस्तू काढायला लागली. जवळ एका भांड्यात रॉकेल घेतलं होतं. समजा चुकून उधळी असेल तर ती त्या भांड्यात झटकून द्यावी असा तिचा विचार होता. 



       आणि बरीच उचकाउचकी केल्यानंतर तिला हवी असलेली "ती" गोष्ट त्यात सापडली. पोथी होती ती तिच्या सासऱ्यांची. त्याच्या वरच्या कपड्याला कच लागला होता. तिचा जीव हळहळला. आतली पोथी चांगली असू दे म्हणून तिनं मनोमन देवाला आळवलं. हळुवार हातांनी त्या पोथीच्या बासनाची गाठ सोडता सोडता तिला तो प्रसंग आठवत होता.



********************



लग्न झालं तेंव्हा ह्या घरात आणि इथल्या वातावरणात तिचं मन रमत नव्हतं. त्या मानानं माहेरी जरा मोकळं वातावरण आणि मुक्तता होती. इथे भरल्या घरात, त्यातही पौरोहित्य करणाऱ्या घरात सोवळं जरा कडक होतं. नियम वेगळे. पण मायेचा ओलावा मात्र झिरपत होता. माहेरी असलेला अवखळपणा जाऊन इथे एकदम जबाबदारी अंगावर आली त्यामुळे भांबावून जायची. रुजायला वेळ लागत होता. जमवून घेता घेता कठीण जात होतं. एकेकाचे स्वभाव समजून घेण्यात दमछाक व्हायला लागली होती. रडवेली व्हायची ती. सगळं सोडून कुठेतरी निघून जावं असं वाटायचं. 




       अशात प्रेम दिलं ते सासरेबुवांनी. घरात तिला जे एकटेपण वाटायचं ते त्यांनी अगदी हळुवारपणे दूर केलं. तिला ते घर मग आपल्या घरासारखं वाटायला लागलं. तिला एकेक गोष्ट सासरेबुवांनी शिकवली. कधी तिला पटकन समजायची, कधी वेळ लागायचा. पण तिने एकेक गोष्ट हळूहळू आत्मसात केली. आणि वर्षभराच्या आत ती त्या घरात अशी रुळली की जणू इथेच तिची नाळ गाडली असावी. 



      असेच एकदा सासरे कुठेतरी भिक्षुकी करायला जाणार होते आणि त्यांना हवी ती पोथी सापडत नव्हती. त्यांची एकदम चिडचिड व्हायला लागली.आजवर कधीही आवाज चढवून न बोलणारे सासरे सगळ्यांवर ओरडून बोलायला लागले. साहजिक घरची सून आणि आता कर्ती म्हणून तिच्यावर जास्ती रोष होता की तिने हलगर्जीपणा करून पोथी कुठेतरी ठेवली. तिने ठेवली नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. 



सगळं घर स्तब्ध झालं आणि ती पोथी शोधू लागलं. अखेर सापडली. आणि ती पोथी घेऊन सासरे बाहेर गेले.  



संध्याकाळी घरी आल्यावर सासरे खजील झाले होते. त्यांना आपण सकाळी केलेल्या चिडचिडीमुळे वाईट वाटत होतं. ती सवयीने त्यांना पाणी घेऊन गेली. आणि आज त्यांच्याशी एक अक्षर न बोलता उभी झाली. त्यांनी तिच्या हातातला पेला घेतला.



"रागावलीस? सकाळी खूप चिडलो. पण तुला ह्या पोथीची कथा सांगतो. बैस."



ती अदबीनं त्यांच्या समोर, खुर्चीवर बसली. पण त्यांच्या त्या तेवढ्या शब्दांनीसुद्धा तिचे डोळे टचकन भरून आले. हळवी झाली ती. त्यांना वडील मानत होती. ते आज चिडल्याने ती खूप अस्वस्थ झाली होती. आपण कमी पडलो ही भावना तिच्या मनात होती. आज प्रकर्षाने तिला माहेरची आठवण आली होती. आपण अजून इथे रुजलो नाही असं वाटायला लागलं होतं. तिचा दीड वर्षाचा मुलगा येऊन तिच्या मांडीत लोळायला लागला. तिने हळूच डोळे पुसले.  




सासऱ्यांनी दीर्घ उसासा घेतला आणि बोलायला सुरुवात केली. 


 


"इथे आलो, त्याआधी आपल्या खेड्यावर आम्ही राहायचो. तिथे आपली शेती होती. जुना वाडा होता. घरी सुबत्ता होती पण ऐश्वर्य नव्हतं. एकत्र कुटुंब होतं. आजी, आजोबा, बोडखी आत्या, आम्ही चार बहीण भावंडं, काका-काकू आणि चुलत भावंडं असे राहायचो. तेंव्हा शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या पण विशेष कल असायचा तो वैदिक शिक्षणावर. भिक्षुकीवर गुजराण व्हायची. शेताचा तुकडा होता. त्यात पिकेल ते धान्य आपलं. सगळा खेळ पावसावर असायचा. गावाच्या बाजूने नदी वाहायची. पण तिला पाणी कमी असायचं.  



  त्या वर्षी मात्र जणू निसर्ग कोपला.  



देवाच्या दयेनी म्हण किंवा पूर्वसंचित म्हण मला तल्लख बुद्धीची देणगी मिळाली होती. एकदा ऐकलेलं एका आवृत्तीमध्ये मला पाठ व्हायचं. पण माझं अक्षर मात्र तितकं चांगलं नव्हतं. दादा, म्हणजे माझे वडील. मला त्यासाठी सारखे रागवायचे की अक्षर सुधरव. रोज लेखन करत जा. म्हणजे अक्षराला वळण येईल. अक्षरावरून आपला स्वभाव ठरतो असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मला कंटाळा यायचा.




  मी घेतलेली संथा तास न तास घोकत बसायचो. गुण्ही केली की जास्त आवृत्ती न करता माझं मुखोद्गत व्हायचं. दादांना फार कौतुक वाटायचं त्या बाबतीत माझं. मला कालांतरानं लक्षात आलं की मला हा गुण आनुवंशिक मिळालेला आहे. दादासुद्धा एकपाठी होते. पण त्यांनी माझं कौतुक करताना कधीच स्वतःच्या ह्या गुणाबद्दल मला जाणीव करून दिली नव्हती. त्यांच्या त्या प्रगल्भ बुद्धिमत्तेची चुणूक मला उशिरा आली. पण मी त्यांच्याच हाताखाली तयार व्हायला लागलो. माझी सहिंता झाली. स्वरांसकट मुखपाठ झाली. कधीतरी एखाद्या अध्यायातल्या एखाद्या श्लोकावर मी अडायचो. आणि पोथी डोळ्यांसमोर नसतानासुद्धा दादा माझी चूक दुरुस्त करायचे. पुढच्या शिक्षणासाठी मला काशीला पाठवायची दादांची इच्छा होती. मलाही आवडलं असतं त्यांच्या गुरुजींकडून पुढील शिक्षण घ्यायला. मला पूर्ण वेद शिकायचा होता. घनपाठी वैदिक व्हायचे होते. 



          सगळं चांगलं सुरू असताना आयुष्यात एक वादळ आलं. अक्षरशः वादळ!



           त्यावर्षी निसर्ग कोपला. आभाळाला जणू कोणी कोरून काढलं असावं. आकाशात युद्ध सुरू असल्यासारख्या विजा चमकून, कानठळ्या बसतील असे गडगडाट करत ढग एकमेकांवर आपटत होते. जणू ढगफुटी झाली असा पाऊस यायला लागला. अवेळी अंधारून आलं. रपरप उभा, आडवा पाऊस पडत होता. सगळा गाव भिजून निघाला आणि घरात बसला राहिला. त्यादिवशी शाळेला सुट्टी मिळाली म्हणून आम्ही सगळे खूश होतो. दादा मला दुपारी घेऊन बसले. आजपासून 'पदं' सुरू करायचे होते. मला संथा दिली. स्वर समजावले. मी आवृत्ती करीत असताना दादा कौतुकानं बघत बसले होते. दादांना संहितेची पोथी त्यांच्या गुरुजींनी गुरुकुलात असताना दिली होती म्हणे. त्यांचा खूप जीव होता त्या पोथीत. एखादा महागामोलाचा दागिना असल्याप्रमाणे ते त्या पोथीला जपायचे. आजवर एकाही पानाला साधी दुमड त्यांनी पडू दिली नव्हती. ती हस्तलिखित पोथी होती. स्वतः दादांच्या गुरुजींनी लिहून दादांना दिली होती. 



त्या दिवशी पावसानं जराही उसंत घेतली नाही. रात्रभर संततधार कोसळत राहिला. सगळ्यांनी संध्याकाळची जेवणं आटोपली. थोड्यावेळानं आम्ही झोपलो. मध्यरात्री कुणीतरी धडधड दरवाजा वाजवायला लागलं म्हणून दादांनी दार उघडलं. आमच्या शेताच्या शेजारी ज्यांच शेत होतं ते काका घाबरेघुबरे होत आले होते. ओले चिंब होते. थंडीनं कुडकुडत होते. त्यांचे दात एकमेकांवर आपटत होते. वाऱ्याचा झोत आणि आवाज राक्षसी होता. त्यांचं बोलणंसुद्धा नीट ऐकू येत नव्हतं. आम्ही सगळे उठून आलो त्यांच्या त्या भेदरल्या आवाजात इतकं फक्त समजलं की धरणाची दारं सोडली आहेत आणि आपल्या नदीला पूर आला आहे. शेतातून दोन माणसं उंचीचं पाणी वाहात आहे. पुराचा लोंढा गावाकडे हळूहळू सरकतो आहे. गाव ताबडतोब रिकामं करायचं आहे. 



कोणालाच काहीच सुचेना. घरातल्या सगळ्यांना दादांनी आवाज दिला. कल्पना दिली आणि आम्ही आमचं घर सोडलं. घरात असलेले दागिने, थोडाफार जवळ असलेला पैसा, चांदीची भांडी आणि देव तेवढे सोबत घेतले. दोन दोन कपड्यांचे जोड, पांघरुण ठेवले सोबत. गावातल्या टेकडीवर असलेल्या देवळात सगळे जमा होत होते. दादांनी आम्हाला पुढे पाठवलं. आणि ते काकांसोबत गावात गेले. बाकी लोकांना सावध करायला. कोणालाच काहीही सुचत नव्हतं. दादांना एकटं सोडून निघायला पाय होत नव्हता. पण त्यांच्यापुढे बोलायची कोणाचीच हिंमत नव्हती. दादा अतिशय खमके होते. त्यांचा निर्णय म्हणजे घरातला शेवटचा शब्द असायचा. 



आम्ही टेकडीवर पोचलो. अर्धा गाव तिथे जमा झाला होता. बाकीचे येत होते. मंदिराचे सभागृह लहान पडत होते. म्हातारी माणसं, लहान मुलं आणि बायका ह्यांची व्यवस्था मंदिराच्या आत करून दिली. सगळी तरुण मंडळी गावात कोणी पुरात अडकायला नको म्हणून निघून गेली. पहाट झाली. पावसाचा जोर कमी होत नव्हता. दादांच्या काळजीनं सगळ्यांचे जीव टांगणीला लागले होते. 




नदीचं उफाणलेलं पाणी आता टेकडीवरून दिसायला लागलं होतं. पूर्ण गाव पाण्याखाली गेला होता. 




आणि दुरून मला दादा टेकडी चढताना दिसले. ओलेचिंब, थकलेले दादा, हातात काहीतरी घेऊन आले. मी गर्दीतून वाट काढत त्यांच्याजवळ गेलो. दादा फार खचल्यासारखे वाटले. मी दिसताच त्यांनी मला जवळ घेतलं. 


त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी हातातली पिशवी मला दाखवली.



त्यात भिजून ओली चिंब झालेली, चिथडे झालेली त्यांची संहितेची पोथी होती.



दादा पार खचले. पुरामुळे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान चीज त्यांनी गमावली होती. उभं पिकं, घरदार, चीजवस्तू गेली त्याचं त्यांना जितकं वाईट वाटलं नाही तितकं ती पोथी भिजून खराब झाली, फाटली ह्याचं दुःख झालं. त्यांनी काळजाला लावून घेतलं. 



पूर ओसरला. आम्ही पुन्हा घरी आलो. जे काय उरलं होतं त्यात पुन्हा नव्याने जगायला लागलो. पण दादा मात्र त्या दिवशी जे कोलमडले ते त्यांना उभारी येत नव्हती. खूप काही गमावलं होतं त्यांनी. त्यांना कसं सावरावं हे कोणालाच समजत नव्हतं. काशीच्या परीक्षेत, तिथल्या महामहोपाध्याय शास्त्रींनी त्यांची स्वतःची हस्तलिखित पोथी दादांना दिली होती ती केवळ त्यांची पात्रता ओळखली म्हणून. आणि ती पोथी पुरात नष्ट झाली होती. दागदागिने, चांदीची भांडी ह्यांची काळजी वाटून मी उचललं पण पोथी टेकडीवर नाही नेली. ही गोष्ट त्यांच्या मनाला खोलवर कुरतडत होती. दादा झुरणी लागले. 



 त्यानंतर ते पूर्ण विझल्यासारखे झाले. हसणं विसरले. त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. ते कोणाशीच बोलेनासे झाले. त्यांच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं इतकी त्यांची रया गेली. माझं शिक्षण बंद झालं. पदं पूर्ण होईना. आणि मला दादांशिवाय कोणाचंकडे शिकायचं नव्हतं. त्या दरम्यान मी रोज संहितेची आवृत्ती मुद्दाम दादांसमोर बसून करायचो. स्वर हलविताना चुका करायचो. दादा खिन्न नजरेनी बघत असायचे; पण माझी चूकसुद्धा ते सांगत नसत. काय करावं आणि दादांना ह्या सगळ्या नैराश्यातून बाहेर काढावं हे मला समजत नव्हतं. त्यांना सुंदर हस्ताक्षर आवडतं म्हणून मी रोज लिखाणाचा सराव करू लागलो. त्यांना दाखवायचो. ते निदान चिडतील तरी त्यांचं मन मोकळं होईल म्हणून प्रयत्न करायचो. पण दादांच्या जणू सगळ्या भावना संपल्या होत्या. 



काळ हळूहळू पुढे सरकत होता; आणि एक दिवस अचानक माझ्या मनात विजेसारखी कल्पना आली. लख्ख झालं सगळं. मनातला अंधार दूर झाला. हस्तलिखित पोथी नष्ट झाल्यानं दादा इतके खचले आहे. जरी ती त्यांना काशीला मिळालेली होती तरी जर त्यांना एक हस्तलिखित पोथी पुन्हा मिळाली तर कदाचित ते ह्या धक्क्यातून बाहेर येऊ शकतील. 



आणि मी चंग बांधला की या वर्षभरात मी दादांना त्या मानसिक अवस्थेतून कुठल्याही हलतीत बाहेर काढेन. मी त्या दिवशीपासून आवृत्ती करायचो पण ती मुखाने नव्हे तर पेनने. एकेक सर्ग, एकेक अध्याय पूर्ण होत होते. एकूण चाळीस अध्याय मला लिहून काढायचे होते. 



सहा महिन्यांनी दादांचा जन्मदिवस होता. चैत्र पौर्णिमेला. हा श्रावण मास सुरू होता. माझ्याकडे बराच अवधी होता. पण दादा त्या काळात क्षीण क्षीण होत होते. गौरी गणपती झाल्या, दिवाळी झाली. दत्ताचं नवरात्र झालं. आता माझ्याकडे थोडा वेळ होता. रोज माझं लिखाण सुरू होतं. हळूहळू एकेक पान पूर्ण होत होतं. मी ते लिखाण फक्त आणि फक्त दादांच्या हाती देणार होतो. त्यांचे आशीर्वाद घेणार होतो. काही चुका असतील तर त्या दुरुस्त करवून घेणार होतो. चैत्र सुरू झाला. पाडवा आला. रामाचं नवरात्र झालं. आणि रामनवमीला माझी पोथी लिहून पूर्ण झाली. आता फक्त काही दिवस उरले होते. मी ती सुरेख केशरी बासनात बांधली. आणि पौर्णिमेला सकाळी ती दादांच्या हाती दिली. दादा त्याच विझू विझू गेलेल्या नजरेनी माझ्याकडे बघत होते. घरातले सगळे तिथे हजर होते. आईने दादांना ते बासनात गुंडाळलेलं बाड उघडायला लावलं. दादांनी ती हस्तलिखित पोथी उघडली आणि आतलं लिखाण बघून त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. त्या दिवसानंतर आज पहिल्यांदा त्यांची कुठलीतरी भावना डोळ्यांवाटे ओसंडून वहात होती. त्यांनी ती माझी हस्तलिखित पोथी उचलून कपाळाला लावली. छातीशी धरली आणि अखंड रडायला लागले.त्यांचा तो भर ओसरेपर्यंत आम्ही सगळेच रडत होतो. ते शांत झाले आणि मला जवळ बोलावलं.



"अक्षर छान सुधरलं. सुवाच्च लिहिलंस."



 हे वाक्य ऐकून तिथले सगळेजण आपापले डोळे कोरडे करायला लागले. कारण ह्या सहा महिन्यात दादा पहिल्यांदा बोलले होते. त्यांनी आईला आवाज दिला. आणि म्हणाले आज घरात काही गोड शिजव. आई पदराने आपले डोळे पुसत आत गेली आणि शिरा भाजायला घेतला. आजीनं येऊन माझी आणि दादांची मिठमोहरीनं दृष्ट काढली. त्यादिवशी आम्ही सगळे खूप दिवसांनी सुखानं जेवलो. दादा सतत त्या पोथीवरून हात फिरवीत होते. आणि साचलेलं सगळं अखंड बोलत होते. आम्ही जिवाचे कान करून त्यांचं बोलणं ऐकत होतो. 


उद्यापासून आपण पदाच्या आवृत्तीला सुरुवात करू असं मला त्यांनी सांगितलं. समाधानाने हसले त्या दिवशी दादा. आणि ती माझी हस्तलिखित पोथी अगदी जवळ घेऊन झोपले.



पण त्या समाधानात झोपलेले दादा सकाळी उठले नाहीत. अतीव समाधानात त्यांनी त्या रात्री मृत्यूला कवटाळलं. दादा गेले, पण माझ्या मनात ह्या पोथीच्या रूपानं एक आठवण, वेदना, संघर्ष, समाधान म्हणून कायम जिवंत राहिले. आज ब्राह्मण सभेत संहिता पारायण आहे. म्हणून मला ही पोथी हवी होती बेटा. तुला बोललो, पण तो भावनांचा असा अनावर आवेग होता."



सासरे बोलून थांबले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तिच्या डोळ्यातूनसुद्धा अश्रू वाहात होते. त्या दिवशी तिला त्या पोथीचं महत्व पूर्ण समजलं होतं. तिनेसुद्धा ती जिवापाड सांभाळली होती. पुढे सासरे गेले. वैदिक शिक्षण घेणारं घरात कोणी उरलं नाही. आणि ती पोथी माघारत जाऊन एका जुन्या लाकडी कपाटात बंदिस्त झाली. आज घर पाडायच्या निमित्याने ती पोथी आणि त्यानिमित्त सासरेबुवांनी सांगितलेली ती आठवण दोन्ही बाहेर आलं. 



ती हस्तलिखित पोथी सुखरूप दिसल्यावर तिलासुद्धा मोलाचा दागिना सापडावा असा आनंद झाला. 



तिने ती उचलून कपाळाला लावली. देवघरात नेऊन ठेवली. आता घर पूर्ण पाडून अगदी चकचकीत नवीन बांधलं असतं तरी तिला फरक पडणार नव्हता. ते हस्तलिखित सुखरूप होतं.


***************************

सौ गायत्री मुळे••


फोन . ९७६७००८९७७


gayatrismuley11@gmail.com


No comments:

Post a Comment